Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लूक - लूक 9

लूक 9:31-62

Help us?
Click on verse(s) to share them!
31ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते.
32तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले.
33मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते.
34तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले.
35आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.”
36ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.
37आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला.
38तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे.
39आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो.
40आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना.
41तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, “हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.”
42मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले.
43मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
44“या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.
45परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते.”
46त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला.
47तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले,
48आणि त्यांना म्हटले, “जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे.”
49तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.”
50तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.”
51आणि असे झाले की त्यास वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेम शहरास जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले.
52मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले,
53पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता.
54तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, “हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?”
55परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, “तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही;
56कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांना तारायला आला आहे.” मग ते दुसऱ्या गावाला गेले.
57आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”
58तेव्हा येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.”
59मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये,” परंतु तो म्हणाला, “हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरू दे,”
60तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मरण पावलेल्यांना आपल्या मरण पावलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”
61तेव्हा आणखी एकजण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे.
62पण येशूने त्यास म्हटले, “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.”

Read लूक 9लूक 9
Compare लूक 9:31-62लूक 9:31-62