Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लूक - लूक 4

लूक 4:9-32

Help us?
Click on verse(s) to share them!
9नंतर सैतानाने येशूला यरूशलेम शहरास नेले आणि परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर त्यास उभे केले आणि तो त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
10शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील,
11आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.’”
12येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असेही म्हणले आहे; तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.”
13म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
14मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
15त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली.
16मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला,
17आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे,
18“प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
19आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे.”
20मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
21त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, “तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे.”
22तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?
23येशू त्यांना म्हणाला, “नक्कीच, तुम्ही मलाही म्हण लागू कराल; हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.” मग तो पुढे म्हणाला,
24“मी तुम्हास खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या नगरात स्वीकारला जात नाही.
25मी तुम्हास खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षापर्यंत आकाशातून पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.
26तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्यास सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
28हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले.
29ते लोक उठले आणि त्यांनी येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्यास लोटून देण्यास तेथवर नेले.
30परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
31नंतर तो गालील प्रांतातील कफर्णहूम गावी गेला. तो शब्बाथ दिवशी सभास्थानात त्यास शिक्षण देत होता.
32ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे.

Read लूक 4लूक 4
Compare लूक 4:9-32लूक 4:9-32