Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योना

योना 3

Help us?
Click on verse(s) to share them!
1परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले,
2“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.”
3मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्व चालत फिरण्यास तीन दिवस लागत होते.
4योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.”
5तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोणताट नेसले.
6निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोणताट नेसून राखेत बसला.
7राजाने आणि त्याच्या सरदारांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिध्द केला. त्याने सांगितले, “कोणत्याही मनुष्यांने अथवा पशूंने, गुराढोरांनी अथवा शेरडामेंढरांनी काही चाखू नये; खाऊ नये व पाणी पिऊ नये.
8परंतु मनुष्य आणि पशू यांनी गोणताट नेसावेत; देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हाताच्या दुष्कर्मापासून मागे फिरावे.
9न जाणो, कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”
10तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत, अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता की, “मी त्यांच्यावर ते आणीन,” त्याविषयी त्याने आपले मन बदलले व त्याने तसे केले नाही.