Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - रूथ

रूथ 3

Help us?
Click on verse(s) to share them!
1रूथची सासू नामी तिला म्हणाली, “माझ्या मुली, तुझे चांगले होऊन तुला विसाव्यासाठी एखादे स्थळ मिळावे म्हणून मला शोध करावयास नको काय?
2तर हे पाहा, ज्याच्या नोकरीणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे.
3तर तू शुद्ध हो, सुगंधीत तेल लाव आणि वस्त्र बदलून खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत तू त्याच्या नजरेला पडू नकोस.
4तो कोठे झोपतो ते पाहून ठेव आणि तो झोपला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरूण काढून तेथे झोपून राहा. मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल.”
5ती म्हणाली, “तुम्ही सांगता ते सर्व मी करीन.”
6तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे केले.
7खाणेपिणे झाल्यावर त्याचे मन प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला. मग ती गुपचूप जाऊन बवाजाच्या पायावरचे पांघरूण काढून तेथे झोपली.
8मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीला पडले.
9तेव्हा तो तिला म्हणाला, “तू कोण आहेस?” ती म्हणाली, “मी आपली दासी रूथ आहे, या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या. कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे.”
10तो म्हणाला, “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या वेळेस अधिक प्रेमळपणा दाखविलास; कारण धनवान किंवा गरीब अशा कोणत्याही तरुणाच्या मागे तू गेली नाहीस.
11तर मुली भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस माहीत आहे की तू सदगुणी स्त्री आहेस.
12मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक नातलग आहे.
13तू रात्रभर येथे राहा आणि सकाळी तो तुझ्यासंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला तर बरेच आहे, त्यास ते करू दे. पण तुझ्यासंबंधाने तो नातलगाचे काम करण्यास तयार झाला नाही, तर परमेश्वराच्या जिविताची शपथ, ते मी करीन. सकाळपर्यंत झोपून राहा.”
14ती त्याच्या पायाशी झोपून राहिली आणि मग मनुष्य मनुष्यास ओळखेल इतके उजाडेल त्याच्या अगोदर उठली, कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये.
15तो तिला म्हणाला, “तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर.” तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मोजून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले. मग तो गावात गेला.
16सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या मनुष्याने जे केले ते तिने तिला सगळे सांगितले.
17तिने सांगितले, “सहा मापे सातू त्याने मला दिले. तो म्हणाला, ‘आपल्या सासूकडे रिकाम्या हाताने जाऊ नको.’”
18ती म्हणाली, “मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा. कारण आज तो मनुष्य या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय शांत राहणार नाही.”