Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते

शास्ते 6

Help us?
Click on verse(s) to share them!
1नंतर इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, त्याने त्यांना मिद्यानाच्या नियंत्रणाखाली सात वर्षे ठेवले.
2तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे, गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.
3आणि असे झाले की, जर इस्राएली पिकांची लागवड करीत, तर मिद्यानी व अमालेकी आणि पूर्वेकडले लोक त्यावर हल्ला करीत.
4त्यांनी त्याच्याविरुध्द सैन्याचा तळ देऊन गज्जापर्यंत भूमीच्या पिकांचा नाश केला आणि इस्राएलात काही अन्न आणि मेंढरे, गाय, बैल किंवा गाढव असे काही एक शिल्लक ठेवले नाही.
5जेव्हा ते आपली जनावरे व तंबू घेऊन आले ते टोळांच्या थव्यासारखे आत आले आणि त्यांची व त्यांच्या उंटाची संख्या मोजणे अशक्य होते; असे ते देशावर आक्रमण करून नाश करावयास आले होते.
6तेव्हा मिद्यानामुळे इस्राएलाची कठीण दुर्बल अवस्था झाली आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली.
7जेव्हा इस्राएलाच्या संतानानी मिद्यान्यांमुळे परमेश्वराकडे मोठ्याने रडून हाक मारली तेव्हा असे झाले की,
8परमेश्वराने कोणी भविष्यवादी इस्राएलाच्या लोकांजवळ पाठवला; तेव्हा तो त्यांना बोलला, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी तुम्हाला मिसरातून काढून वर आणले, दास्याच्या घरातून बाहेर काढून आणले;
9असे मी तुम्हाला मिसऱ्यांच्या हातातून व तुमच्या सर्व जाचणाऱ्यांच्या हातातून सोडवले; आणि त्यांना तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हाला दिला.
10तेव्हा मी तुम्हाला असे सांगितले की, “मी तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहत आहा, त्यांच्या देवांना भिऊ नका, तरी तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही.”
11आणखी परमेश्वराचा दूत येऊन अबियेजेरी योवाश याच्या अफ्रा येथील एला झाडाखाली बसला; तेव्हा त्याचा पुत्र गिदोन मिद्यांन्यापासून गहू लपवावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता.
12आणि परमेश्वराचा दूत त्यास दर्शन देऊन त्यास बोलला, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
13तेव्हा गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्या बाबतीत का घडले? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर आणले आणि त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमचे पूर्वज आम्हाजवळ सांगत आले, परमेश्वराने आम्हांला मिसरातून वर आणले की नाही? आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हांला मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.”
14मग परमेश्वराने त्याच्याकडे बघितले आणि म्हटले, “तू आपल्या या बळाने जा, आणि इस्राएलांना मिद्यान्यांच्या ताब्यातून सोडव; मी तुला पाठवले आहे की नाही?”
15गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, मी इस्राएलला कसा सोडवणार? पाहा, मनश्शेत माझे घराणे कमजोर आहे, आणि मी आपल्या पित्याच्या घरात कमी महत्त्वाचा आहे.”
16परमेश्वर त्यास बोलला, “खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका मनुष्यास मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यान्यांना ठार करशील.”
17गिदोन त्यास बोलला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव.
18मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.”

19गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले.
20तेव्हा देवाच्या दूताने त्यास सांगितले, “तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत.” मग गिदोनाने तसे केले.
21तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसास व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्यास पाहू शकला नाही.
22तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!”
23परमेश्वर त्यास म्हणाला, “तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.”
24तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे.
25आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्यास सांगितले की, “तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षांचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बआल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळची अशेरा कापून टाक.
26मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर याच्यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधणी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लाकडाचा उपयोग करून कर.”
27तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्यास सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायला तो आपल्या वडिलाच्या घराण्याला व त्या नगराच्या मनुष्यांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले.
28मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बआलाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळची अशेराही तोडलेली होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता.
29तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.”
30नंतर त्या नगराच्या मनुष्यांनी योवाशाला सांगितले, “तू आपल्या पुत्राला बाहेर आण, त्यास तर मारावयाचे आहे, कारण त्याने बआलाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ती तोडून टाकली आहे.”
31तेव्हा योवाश आपणावर जे उठले होते त्या सर्वांना म्हणाला, “बआलाचा कैवार तुम्ही घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याचा कैवार घेईल तो आज सकाळ आहे तोच मारला जावो; जर तो देव असला तर, ज्याने त्याची वेदी मोडली त्याच्याविरुध्द त्याने स्वत:चा कैवार घ्यावा.”
32तेव्हा त्याच दिवशी त्याने त्यास “यरूब्बाल” म्हटले, तो म्हणाला, “गिदोनाने बआलाची वेदी पाडून टाकली म्हणून बआलानेच त्याच्याविरुध्द स्वतःचा बचाव करावा,” कारण त्याची वेदी गिदोनाने मोडून वेगळी केली.
33नंतर सर्व मिद्यानी व अमालेकी व पूर्वेकडले लोक एकत्र जमले, आणि त्यांनी यार्देन नदी ओलांडून येऊन आणि इज्रेलाच्या खोऱ्यात तळ दिला.
34परंतु परमेश्वराचा आत्मा गिदोनावर त्यास मदत करण्यासाठी आला; गिदोनाने कर्णा फुंकला, तेव्हा अबीयेजेराचे वंशज त्याच्याजवळ अशाप्रकारे त्याच्यामागे जाण्यासाठी एकत्र आले.
35मग त्याने सगळ्या मनश्शेत जासूद पाठवले तेव्हा तेही त्याच्याजवळ एकत्र झाले; नंतर आशेर व जबुलून व नफतालीत त्याने जासूद पाठवले, तेव्हा ते त्यांच्याशी मिळायला चढून गेले.
36मग गिदोन देवाला बोलला, “जसे मला सांगितले तसा जर तू माझ्या हाताने इस्राएलांना तारणार असलास;

37तर पाहा, मी खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; जर लोकरीवर मात्र दहिवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल की जसे मला सांगितले, तसा तू माझ्या हाताने इस्राएलाला तारशील.”
38नंतर तसे झाले; म्हणजे सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तिच्यातून पिळून वाटीभर पाणी काढले.
39मग गिदोन देवाला बोलला, “तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्या व्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.”
40तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले.