Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते

शास्ते 21

Help us?
Click on verse(s) to share them!
1आता इस्राएली मनुष्यांनी मिस्पात अशी शपथ वाहिली होती की, “आमच्यातला कोणीही आपल्या मुली बन्यामिनाला लग्नासाठी देणार नाही.”
2नंतर लोक बेथेल नगरास गेले आणि संध्याकाळपर्यंत देवापुढे बसून राहिले, आणि मोठ्याने आवाज करून फार दु:खाने रडले.
3ते मोठ्याने म्हणाले, “हे इस्राएलाच्या देवा परमेश्वरा, इस्राएलात असे का झाले की आज इस्राएलातून एक वंश नाहीसा झाला आहे.”
4नंतर दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस लवकर उठून तेथे वेदी बांधली, आणि होमार्पण व शांत्यर्पण यज्ञ केले.
5इस्राएली लोक म्हणाले, सर्व इस्राएली वंशांतला जो कोणी मंडळीत परमेश्वराजवळ चढून आला नाही, असा कोण आहे? कारण जो कोणी परमेश्वराजवळ मिस्पात चढून आला नाही. त्याविषयी अशी महत्त्वाची शपथ केली होती की, “ते म्हणाले, जे कोणी आले नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”
6इस्राएलाच्या लोक आपला भाऊ बन्यामीन याविषयी कळवळा करून म्हणाले, “आज इस्राएलातून एक वंश कापला गेला आहे;
7जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी कोण पत्नीची तरतूद करील? कारण आम्ही परमेश्वराजवळ शपथ वाहिली की, आम्ही आपल्या मुलींपैकी कोणीही त्यांना लग्नासाठी देणार नाही.”
8त्यांनी म्हटले, इस्राएलाच्या वंशांतला जो कोणी “मिस्पात परमेश्वर देवा जवळ चढून आला नाही; असा कोण आहे?” तेव्हा याबेश गिलादातला कोणीही मंडळीत आला नव्हता हे त्यांना कळले.
9कारण लोकांची मोजणी घेतली गेली, तेव्हा पाहा, याबेश गिलादात राहणाऱ्यांपैकी कोणीही तेथे आला नव्हता.
10मंडळीने शूर असे बारा हजार पुरुष सूचना देऊन याबेश गिलादाकडे पाठवले, “आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा आणि स्त्रियांना व पुत्रांनासुद्धा तलवारीने मारा.
11हे करा, तुम्हाला जे करायचे ते हेच की सर्व पुरुष आणि जिचा पुरुषाशी लैंगिक संबंध आला आहे ती प्रत्येक स्त्री, त्यांचा नाश करावा.”
12तेव्हा याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांमध्ये ज्यांचा पुरुषाशी संबंध आला नव्हता, अशा चारशे कुमारी त्यांना मिळाल्या आणि त्यांनी त्यांना कनान देशात शिलो छावणीत आणले.
13तेव्हा सर्व मंडळीने रिम्मोन खडकावर जे बन्यामिनी लोक राहत होते त्यांच्याकडे निरोप पाठवून त्यांच्याशी शांतीचे बोलणे केले.
14तेव्हा बन्यामिनी माघारी आले, आणि त्यांनी याबेश गिलादातल्या स्त्रिया त्यांना पत्नी करून दिल्या; परंतु त्या सर्वांना त्या पुरल्या नाहीत.
15लोकांस बन्यामिनाविषयी दु:ख वाटले. कारण की, परमेश्वराने इस्राएलाच्या वंशांत फाटाफूट केली होती.
16यास्तव मंडळीच्या वडीलांनी म्हटले, जे उरलेले त्यांना पत्नी मिळण्याविषयी आम्ही काय करावे? कारण त्यांनी “बन्यामिनी स्त्रियांना मारून टाकले होते.”
17आणखी त्यांनी म्हटले, इस्राएलापासून एक वंश नाश होऊ नये, “म्हणून बन्यामिनाच्या उरलेल्यांना वतन मिळावे.
18आम्ही आपल्या कन्येतून त्यांना स्त्रिया करून देऊ शकत नाही. कारण इस्राएलाच्या लोकांनी अशी शपथ वाहिली होती की, जो बन्यामिनाला पत्नी करून देतो, तो शापित होईल.”

19नंतर ते म्हणाले, “शिलोम छावणीमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी सण असतो, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.”
20त्यांनी बन्यामिनी लोकांस अशी आज्ञा दिली की, “तुम्ही द्राक्षमळ्यांमध्ये जा आणि लपून राहा.
21मग जेव्हा शिलोतल्या मुली नाचायला निघतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यांतून बाहेर निघून प्रत्येकाने आपल्यासाठी शिलोतल्या कन्येतून पत्नी करून घ्यावी, आणि मग बन्यामिनाच्या देशास परत मागे जावे.
22जेव्हा त्यांचे वडील किंवा त्यांचे भाऊबंद एक होऊन आमच्याजवळ निषेध करण्यास येतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, तुम्ही त्यांना राहू द्या, आमच्यावर कृपा करा! कारण लढाईत आम्हांला त्यांच्यातील एकएकासाठी पत्नी मिळाली नाही. आणि तुम्ही शपथेविषयी दोषी नाहीत, कारण तुम्ही स्वतः त्यांना तुमच्या मुली दिल्या नाहीत.”
23यास्तव बन्यामिनाच्या लोकांनी तसे केले, आणि आपल्या संख्येप्रमाणे कन्या पकडून पत्नी करून घेतल्या. नंतर ते माघारी आपल्या वतनावर गेले, आणि तेथे नगरे बांधून त्यामध्ये राहिले.
24त्यानंतर इस्राएली लोक तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर परत गेले.
25त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता. प्रत्येकजण त्यास जे बरे वाटे, ते करीत होता.