Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते

शास्ते 8

Help us?
Click on verse(s) to share them!
1तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनाला म्हणाली, “तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेलास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.
2तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबीयेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय?
3मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.
4गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला.
5तेव्हा तो सुक्कोथातल्या मनुष्यांना म्हणाला, “माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपा करून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.”
6तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबह व सलमुन्ना यांच्यावर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हास माहीत नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?
7तेव्हा गिदोन म्हणाला, “जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल, तेव्हा मी रानातल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.”
8नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याच प्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथातल्या मनुष्यांनी उत्तर दिले होते, तसेच पनुएलातल्या मनुष्यांनी त्यास उत्तर दिले.
9तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, “जेव्हा मी शांतीने माघारी येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.”
10तेव्हा जेबाह व सलमुन्ना कर्कोरात होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्यांच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरुष तलवारीने पडले होते.
11तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.
12जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाच्या ह्या दोन राजांना पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.
13मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला.
14तेव्हा त्याने सुक्कोथातला एक तरुण मनुष्य धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण मनुष्याने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर मनुष्यांचे वर्णन लिहून दिले.
15मग तो सुक्कोथातल्या मनुष्यांजवळ जाऊन बोलला, “हे पाहा, जेबाह व सलमुन्ना! याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहेस काय? आम्हास माहीत नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी?”
16नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानातल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या मनुष्यांना शिक्षा केली
17आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरातल्या मनुष्यांना मारून टाकले.
18मग जेबह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, “जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती?” तेव्हा ते बोलले, “जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता.”

19गिदोन म्हणाला, “ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते, तर परमेश्वराशपथ मी तुम्हाला मारले नसते.”
20तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, “तू उठून त्यांना मार. परंतु त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता,” म्हणून तो घाबरला.
21तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हांला मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांना मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.
22तेव्हा इस्राएलातल्या मनुष्यांनी गिदोनाला म्हटले, “तू, तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने आमच्यावर राज्य करावे, कारण तू आम्हास मिद्यानाच्या तावडीतून सोडवले आहे.”
23तेव्हा गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही, तर परमेश्वर तुमच्यावर राज्य करील.”
24तरी गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे.” त्यामध्ये तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.
25तेव्हा ते बोलले, “आम्ही देतोच देतो.” मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यातल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.
26आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यानी राजांची जांभळी वस्रे यांखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.
27तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यामध्ये ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.
28मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.
29योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला.
30आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्यास पुष्कळ पत्नी होत्या.
31आणि शखेमात जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्यास पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले.
32मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्यास अबीयेजऱ्यांच्या अफ्रा येथे त्याचा पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात आले.
33तेव्हा असे झाले की, गिदोन मरण पावल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बआल-बरीथ ह्याला आपला देव केले.
34असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही.
35आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.