Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - शास्ते

शास्ते 13

Help us?
Click on verse(s) to share them!
1तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.
2तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी मनुष्य होता; त्याचे नाव मानोहा होते, आणि त्याची स्त्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते.
3तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, “पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील.
4आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले ते अन्न खाऊ नको.
5पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयाच्या जाचातून सोडवण्याचा आरंभ करील.”
6तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, “देवाचा मनुष्य माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्यास विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही.
7परंतु तो मला म्हणाला, पाहा, तू गरोदर होशील, आणि तू पुत्राला जन्म देशील; तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि जे काही नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको; कारण तो बाळ तुझ्या गर्भावस्थेपासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल.
8तेव्हा मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करून म्हटले, हे माझ्या प्रभू, माझे ऐक, जो देवाचा मनुष्य तू पाठवला होता, त्याने आमच्याजवळ पुन्हा यावे, आणि जो पुत्र जन्मेल, त्याच्यासाठी आम्ही काय करावे, हे आम्हांला शिकवावे.”
9तेव्हा देवाने मानोहाचा शब्द ऐकला, यास्तव देवाचा दूत त्या स्त्रीजवळ ती शेतात बसली असता पुन्हा आला तिचा पती मानोहा तिच्यासोबत नव्हता.
10तेव्हा ती स्त्री त्वरीत पळाली आणि आपल्या पतीला म्हणाली: “पाहा, जो पुरुष त्यादिवशी माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.”
11मग मानोहा उठून आपल्या पत्नीच्यामागे चालून त्या पुरुषाजवळ गेला, आणि त्यास बोलला, “जो पुरुष माझ्या पत्नीबरोबर बोलला होता,” तो तूच आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, “होय मीच आहे.”
12मग मानोहा म्हणाला, “तुझे शब्द खरे ठरोत; परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल?”
13तेव्हा परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटले, “जे मी या स्त्रीला सांगितले, त्याविषयी हिने काळजीपूर्वक रहावे.
14द्राक्षवेलापासून जे येते त्यातले काहीही हिने खाऊ नये, आणि मद्य व मादक द्रव्य पिऊ नये, आणि नियमाप्रमाणे जे काही अशुद्ध जाहीर केले आहे ते खाऊ नये; जे सर्व मी हिला आज्ञापिले त्याचे तिने पालन करावे.”
15तेव्हा मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “आम्ही तुला विनंती करतो थोडा वेळ थांब, तुझ्यासाठी करडू तयार करण्यास आम्हांला वेळ दे,”
16परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, “मी जरी थांबलो तरी, मी तुझे अन्न खाणार नाही; परंतु जर तू होमार्पण करशील, तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल,” (तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता, हे मानोहाला कळले नव्हते)
17मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, “तुझे नाव काय आहे, कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू?”
18तेव्हा परमेश्वराचा दूत त्यास म्हणाला, “तू माझे नाव कशासाठी विचारतोस? ते आश्चर्यजनक आहे.”

19मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्यास खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना,
20जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.
21मग परमेश्वराचा दूत मानोहाच्या व त्याच्या पत्नीच्या दृष्टीस फिरून पडला नाही; तेव्हा मानोहाला कळले की, तो परमेश्वराचा दूत होता.
22मग मानोहा आपल्या पत्नीला म्हणाला, आपण खचीत मरू, कारण आपण देवाला पाहिले आहे.
23तेव्हा त्याची पत्नी त्यास म्हणाली, “जर परमेश्वर देवाला आपल्याला मारायची इच्छा असती, तर त्याने आपल्या हातातून होमार्पण व अन्नार्पण स्वीकारले नसते, आणि या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या नसत्या, तसेच या वेळेसारखे वर्तमान आपल्याला ऐकवले नसते.”
24नंतर त्या स्त्रीला पुत्र झाला, आणि तिने त्याचे नाव शमशोन ठेवले; तो पुत्र वाढत गेला, या प्रकारे परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला.
25तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महने-दानाच्या छावणीत त्यास परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.