Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 शमु.

2 शमु. 17

Help us?
Click on verse(s) to share them!
1त्यानंतर अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, मला आता बारा हजार मनुष्यांची निवड करू दे, म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो.
2तो थकला भागलेला असताना भयभीत झालेला असतानाच मी त्यास पकडीन. हे पाहून त्याचे लोक पळ काढतील फक्त राजा दावीदाचा मी वध करीन.
3बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन. तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक तक्रार न करता परत येतील.
4अबशालोम आणि इस्राएलमधील सर्व वडीलधारी मंडळी यांना हा बेत पसंत पडला.
5पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला हूशय अर्की यालाही बोलावून घ्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे.
6मग हूशय अबशालोमकडे आला अबशालोम त्यास म्हणाला, अहिथोफेलची योजना अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग.
7हूशय अबशालोमला म्हणाला, अहिथोफेलचा सल्ला आता या घटकेला तरी रास्त नाही.
8तो पुढे म्हणाला, तुमचे वडील आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगले बळकट आहेत हे तुम्ही जाणताच. त्यातून ते आता पिल्ले हिरावून नेलेल्या रानातल्या अस्वलासारखे चिडलेले आहेत. तुमचे वडील एक कुशल योद्धा आहेत. ते भरवस्तीत रात्रभर मुक्काम करणार नाहीत.
9एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.
10मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांस ठाऊक आहे.
11तेव्हा मी असे सुचवतो तुम्ही दानपासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएल लोकांस एकत्र आणा म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल मग तुम्ही स्वत:युध्दात उतरा.
12दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्यास धरून आणू जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू दावीदाला त्याच्या बरोबरच्या मनुष्यांसहीत आम्ही ठार करू कुणालाही सोडणार नाही.
13पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोक ते नगर ओढून दरीत ढकलू, मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही.
14अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, अहिथोफेलपेक्षा हूशय अर्की याचा सल्ला चागंला आहे. आणि तो सर्व लोकांस पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.
15हूशयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याजकांच्या कानावर घातले. अबशालोम आणि इस्राएलमधील वडील मंडळी यांना अहिथोफेलने जे सुचवले ते हूशयने या दोघांना सांगितले. तसेच आपण काय सुचवले तेही सविस्तर सांगितले. हूशय म्हणाला,
16आता त्वरा करा ताबडतोब दावीदा कडे निरोप जाऊ द्या नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा. ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत.
17योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्याकडे आली तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.
18पण एका मुलाने योनाथान आणि अहीमास यांना पाहिले हे अबशालोमला सांगायला तो धावत निघाला. योनाथान आणि अहीमास तेथून चटकन् निघाले. ते बहूरीम येथे एकाच्या घरी पोचले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. त्यामध्ये उतरून ते लपले.

19त्या मनुष्याच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही.
20अबशालोमाकडील नोकर त्या घरातल्या स्त्रीकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहीमासचा ठावठिकाणा विचारला. ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले. मग अबशालोमचे ते नोकर योनाथान आणि अहीमास यांच्या शोधार्थ निघाले. पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरूशलेमेला परत गेले.
21इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्यास म्हणाले, असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे सांगितले आहे.
22तेव्हा दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोंचले होते.
23इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरेतच दफन केले.
24दावीद महनाईम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलीं समवेत यार्देन नदी ओलांडली.
25अबशालोमने अमासा याला सेनापती केले. यवाबाची जागा अमासाने घेतली. अमासा इस्राएली इथ्राचा पुत्र. अमासाची आई अबीगईल. सरुवेची बहीण नाहाश हिची ही अबीगल कन्या. सरुवे यवाबाची आई.
26अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला.
27दावीद महनाईम येथे आला शोबी, माखीर आणि बर्जिल्लय तेथेच होते. नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार तर बर्जिल्ल्य गिलाद येथील रोगलीमचा होता.
28ते म्हणाले, हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानलेले भुकेलेले असे आहेत. त्यांनी दावीद आणि इतर सर्वजणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने, भांडीकुंडी सुध्दा ते घेऊन आले.
29गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वाटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.