Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 इति.

2 इति. 5

Help us?
Click on verse(s) to share them!
1अशारितीने शलमोनाने ठरवलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व कार्य समाप्त झाले. आपले पिता दावीद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने आत आणल्या. सोन्यारुप्याच्या सर्व वस्तू आणि इतर सामानसुमान मंदिराच्या कोषागारात त्याने आणून ठेवले.
2पुढे शलमोनाने, परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदाचे नगर, म्हणजेच सीयोनमधून, आणण्यासाठी इस्राएलातील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरूशलेम येथे बोलावून घेतले.
3सातव्या महिन्यातील, मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले.
4सर्व इस्राएलाचे वयोवृद्ध एकत्रित आल्यावर लेवींनी कराराचा कोश उचलून घेतला.
5याजक आणि लेवी यांनी मिळून कोश यरूशलेमेला आणला. दर्शनमंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र पात्रे त्यांनी बरोबर आणली. लेवी वंशातील याजकांनी ती आणली.
6राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक कराराच्या कोशाला सामोरे गेले कोशासमोर त्यांनी मोजता येणार नाहीत इतक्या मेंढरांचे आणि गुराढोरांचे बली अर्पण केले.
7एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या नेमलेल्या ठिकाणी तयार करवून घेतलेल्या सर्वात पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराच्या कराराचा कोश करुबांच्या पखांच्या खाली ठेवला.
8कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले.
9त्यांचे दांडे एवढे लांब होते कि त्यांची टोके पवित्र गाभाऱ्यासमोर कोशातून बाहेर आलेली दिसतील, पण बाहेरुन ते दिसू शकत नव्हते. आजपर्यंत ते तेथे आहेत.
10दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते. होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या कराराच्या कोशात ठेवल्या होत्या. इस्राएल लोक मिसरातून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो याच होरेब पर्वतावर केला.
11एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. तेथे उपस्थित असणारे सर्व पवित्र झाले होते. ते सर्व गटागटांमध्ये विभागले. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले.
12मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले आसाफ, हेमान आणि यदूथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांचे पुत्र आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये हातात घेवून वेदीच्या पुर्व टोकाकडे उभे होते. या लेवी गायकांबरोबर ऐकशे वीस याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते.
13गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्यास धन्यवाद दिले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्या सोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली. त्यांच्या गायनाचा आशय असा होता: “परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीती सर्वकाळ राहते.” तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले.
14त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरुन गेले होते.