Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 इति.

2 इति. 1

Help us?
Click on verse(s) to share them!
1परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले.
2शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील वाडवडीलांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांशी बोलला.
3मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. कारण परमेश्वराचा दर्शनमंडप तेथे होता, कारण परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक रानात असतांना मोशेने तो बनवला होता.
4दाविदाने देवाचा कोश किर्याथ-यारीमाहून वर यरूशलेम येथे आणला होता. यरूशलेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दाविदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरूशलेमेमध्ये एक तंबू उभारला होता.
5हुराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती, म्हणून शलमोन आपल्याबरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला.
6दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर पितळी वेदी होती तेथे शलमोनाने एक हजार होमार्पणे केली.
7त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, “शलमोना, तुला काय हवय ते माग!”
8शलमोन परमेश्वरास म्हणाला, “माझे पिता दावीद यांच्यावर तुझी फार कृपादृष्टी होती, त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस.
9आता, हे परमेश्वर देवा, तू माझे पिता दावीद यांना दिलेले वचन पूर्ण कर, कारण ज्या राष्ट्रांचा तू मला राजा केले आहेस, त्याच्या प्रजेची संख्या पृथ्वीवरील मातीच्या रज:कणांसारखी विपुल आहे.
10या लोकांस उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे, तुझ्या एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणाला जमणार?”
11तेव्हा परमेश्वर देव शलमोनाला म्हणाला, “हे तुझ्या मनात होते, आणि तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा सन्मान यांची मागणी केली नाहीस तसेच तुझा द्वेष करणाऱ्या शत्रूंचाही नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस, तसेच स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस तर ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेवर राज्य करता यावे म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस;
12आता तुला ज्ञान व बुद्धी देण्यात आली आहेत; तुझ्या पुर्वीच्या कोणाही राजाला मिळाले नाही व तुझ्यानंतर कोणत्याही राजाला मिळाले नाही एवढे ऐश्वर्य, संपत्ती व बहुमान मी तुला देईन.”
13मग शलमोन गिबोनाच्या उच्चस्थानाहून, दर्शनमंडपासमोरून यरूशलेमेस आला, व इस्राएलावर राज्य करू लागला.
14शलमोनाने घोडे आणि चौदाशे रथ यांची जमवाजमव केली. त्याच्याकडे बारा हजार घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने रथासाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले, व काही जनांना त्याने आपल्याजवळ यरूशलेम येथेच ठेवून घेतले.
15राजाने यरूशलेमेमध्ये चांदी व सोन्याचा एवढा संचय केला की, ते दगडांप्रमाणे विपुल झाले तसेच गंधसरूचे लाकूड पश्चिमेकडील डोंगराळ भागात उंबराचे लाकूड जसे विपुल होते तसे केले.
16मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे मागवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोडयांची खरेदी करत.
17त्यांनी प्रत्येक रथ सहाशे शेकेल चांदीला व प्रत्येक घोडा दिडशें शेकेल चांदीला या प्रमाणे मिसरामधून ही खरेदी करून मग ते हेच रथ आणि घोडे हित्ती व अरामी राजांना विकले.