1शलमोनाने पितळेची वेदी बनवली. तीची लांबी तीस हात, रूंदी तीस हात व उंची दहा हात होती.
2त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास दहा हात होता. त्याची उंची पाच हात आणि त्याचा कडेचा परीघ तीस हात होता.
3प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एकसंध तुकड्यातून ते बनवले होते.
4बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन पुर्वभीमुख होते, तीन उत्तराभिमुख तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षिणभिमुख व गंगाळ त्यांच्यावर होते सर्व बैलांचा पार्श्व भाग आतील बाजूकडे होता.
5या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.
6याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.
7शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले.
8तसेच दहा मेज बनवून पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे बनवले.
9याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.
10एवढे झाल्यावर आग्नेयला दिशेस मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
11हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
12दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
13त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
14तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
15मोठे पितळी गंगाळ आणि त्यास आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
16शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.
17या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
18शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.
19याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, व समर्पित भाकर ठेवण्याची मेजे ही केली.
20सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
21याव्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुद्ध सोन्याचे होते.
22कातऱ्या, वाडगी, कटोरे, चमचे, धुप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनवीली त्याचप्रमाणे मंदिराची दरवाजे, अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातली दरवाजे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.