Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 शमु.

1 शमु. 24

Help us?
Click on verse(s) to share them!
1असे झाले, शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्यास कोणी सांगितले की, दावीद एन-गेदीच्या रानात आहे.
2तेव्हा शौल सर्व इस्राएलातून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.
3आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.
4तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा.” मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.
5त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्यास टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते.
6आणि त्याने आपल्या मनुष्यांस म्हटले, “मी आपल्या धन्यावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.”
7असे बोलून दावीदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.
8नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, “हे माझ्या प्रभू, राजा.” तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला
9मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता?
10पाहा आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की, परमेश्वराने गुहेत आज तुम्हास माझ्या हाती दिले होते. तुम्हास जिवे मारावे असे कोणी मला सांगितले. पण मी तुम्हास सोडून दिले; मी बोललो की, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.
11आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जिवे मारले नाही. यावरुन माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुध्द पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.
12माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
13दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
14इस्राएलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मरण पावलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या!
15यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करो. हे पाहून तो माझा वाद करो आणि तुमच्या हातून मला सोडवो.”
16असे झाले की, दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे संपवल्यावर, शौल म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” मग शौल गळा काढून रडला
17आणि तो दावीदाला म्हणाला, “माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस. परंतु मी तुझे वाईट केले आहे.
18तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही.

19कोणा मनुष्यास त्याचा वैरी सापडला तर तो त्यास चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो.
20आता पाहा मी जाणतो की, तू खचित राजा होशील आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल.
21म्हणून आता तू माझ्याशी परमेश्वराची शपथ वाहा की, तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या वडिलाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.”
22तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडावर चढून गेली.