Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 शमु.

1 शमु. 20

Help us?
Click on verse(s) to share them!
1दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला, “मी काय केले आहे? माझा अपराध काय? तुझ्या वडिलाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?”
2तेव्हा त्याने त्यास म्हटले, “असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही. तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.”
3मग दावीद शपथ वाहून म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो; म्हणून तो म्हणतो, हे योनाथानाला कळू नये कळले तर त्यास दुःख होईल; परंतु खरोखर परमेश्वर जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.”
4तेव्हा योनाथान दावीदाला म्हणाला “जे काही तुझा जीव इच्छितो ते मी तुझ्यासाठी करीन.”
5दावीद योनाथानाला म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे तेव्हा मला राजाबरोबर जेवण्यास बसणे भागच आहे; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यंत मी रानात लपून राहीन.
6जर तुझ्या वडिलाने माझी आठवण काढलीच तर सांग की, दावीदाने आपले गाव बेथलहेम येथे जायला माझ्याकडे आग्रह करून रजा मागितली कारण तेथे त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे.
7जर तो, ठीक आहे असे म्हणेल तर तुझ्या दासास शांती प्राप्त होईल. परंतु जर त्यास राग आला, तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण.
8यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर. कारण तू आपल्या दासास आपल्याबरोबर परमेश्वराच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?”
9तेव्हा योनाथान म्हणाला, “तुला असे न होवो माझ्या वडिलाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी ते तुला सांगणार नाही काय?”
10तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला, “जर कदाचित तुझ्या वडिलाने तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?”
11योनाथान दावीदाला म्हणाला, “चल आपण रानात जाऊ.” मग ते दोघे बाहेर रानात गेले.
12योनाथान दावीदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी असो. उद्या किंवा परवा या वेळेस मी आपल्या बापाचे मन पाहीन, तेव्हा पाहा जर, दावीदाविषयी त्याचे मन चांगले असेल तर मी तुझ्याकडे निरोप पाठवून ते तुला कळवणार नाही काय?
13जर तुझे वाईट करावे असे माझ्या बापाला वाटले आणि जर मी ते तुला कळवले नाही, आणि तू शांतीने जावे म्हणून मी तुला रवाना केले नाही, तर परमेश्वर देव योनाथानाचे तसे व त्यापेक्षा अधिक करो. परमेश्वर जसा माझ्या बापा बरोबर होता तसा तो तुझ्या बरोबर असो.”
14मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू परमेश्वराची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही,
15तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; परमेश्वर दावीदाचा प्रत्येक शत्रू भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको;
16म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले, “परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो.”
17मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीती केली.
18योनाथान त्यास म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील.

19तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा.
20मी निशाणावर नेम धरत आहे असे दाखवून तीन बाण त्याच्या बाजूला मारीन.
21मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणालो, पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तू ये; कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; परमेश्वर जिवंत आहे.
22परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण परमेश्वराने तुला पाठवून दिले आहे.
23आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा परमेश्वर तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर साक्षी आहे.”
24मग दावीद रानात लपून राहिला आणि चंद्रदर्शन आली तेव्हा राजा जेवायला बसला.
25राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती.
26तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्यास असे वाटले, त्यास काही झाले असेल, खचित तो शुद्ध नसेल.
27मग चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की, दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले, “इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.”
28तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की, “दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली.
29तो म्हणाला, मी तुला विनंती करतो मला जाऊ दे कारण आमचे घराणे नगरात यज्ञ करणार आहे आणि मला माझ्या भावाने आज्ञा केली आहे म्हणून आता तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊ दे. यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही.”
30तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्यास म्हणाला, “अरे विपरीत फितूर खोर पत्नीच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय?
31कारण जोपर्यंत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे तोपर्यंत तू आणि तुझे राज्यही स्थापित होणार नाही. म्हणून आता माणसे पाठवून त्यास माझ्याकडे आण, कारण त्यास खचित मरण पावले पाहिजे.”
32मग योनाथानाने आपला बाप शौल याला उत्तर देऊन म्हटले, “त्याने कशासाठी मरावे? त्याने काय केले आहे?”
33तेव्हा शौलाने त्यास मारायला भाला फेकला यावरुन योनाथानाला कळले की, आपल्या वडिलाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे.
34मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला.
35मग असे झाले की, योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळी आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला.
36तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला.

37जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?”
38योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नको.” तेव्हा योनाथानाचा पोर बाण गोळा करून धन्याकडे आला.
39मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती.
40योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला दिली व त्यास म्हटले, “चल ही उचलून घेऊन नगरात जा.”
41पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.
42योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा; कारण आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो” मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.