1परमेश्वर असे म्हणतो, “मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्यांचा चुना केला.
2म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन, आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील. आणि मवाब गोंधळात, आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल.
3मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन, आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.” असे परमेश्वर म्हणतो.
4परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नकारले आहे, आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली अशाच प्रकारे त्यांचे पुर्वजसुद्धा वागत होते.
5म्हणून मी यहूदात आग लावीन. त्या आगीत यरूशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”
6परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलच्या तिन्ही अपराधांमुळे, तर अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी चांदीसाठी निरपराध आणि पायातील वाहाणांच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे.
7जसे लोक माती पायाखाली तुडवतात तसेच ते गरीबांची मस्तके मातीत तुडवतात; आणि मुलांनी व त्यांच्या वडीलांनी एकाच स्त्रीशी संबंध ठेवले, अशासाठी की माझे नाव धुळीस मिळावे.
8आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात, आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्यांचा द्राक्षरस पितात.
9मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला, ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती; ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
10तुम्हास मिसरमधून आणणारा मीच आणि चाळीस वर्षे मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले ह्यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा.
11मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे होण्यासाठी आणि तुमच्यातील काही तरुणांना नाजीर होण्यास वाढवले, इस्राएल लोकांनो, हे असे नाही काय?” असे परमेश्वरा म्हणतो.
12“पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले, आणि संदेष्ट्यांना भविष्य सांगण्यास मनाई केली.
13पाहा, जसा पेंढ्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल, त्याच प्रकाराने मी तुम्हास दाबून टाकीन.
14चपळ व्यक्ती सुटणार नाही; बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही, आणि वीराला स्वत:चा जीव वाचवता येणार नाही.
15धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही. आणि जोरात धावणारे सुटणार नाही; घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही.
16वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल” असे परमेश्वर म्हणतो.