Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - मला.

मला. 2

Help us?
Click on verse(s) to share them!
1“आणि आता, याजकांनो, हा आदेश तुमच्यासाठी आहे.
2सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यास आधीच शाप दिला आहे. कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस.
3पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुमच्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हासही फेकून देण्यात येईल.
4आणि तेव्हा तुम्हास कळेल की, माझा करार लेवी बरोबर असावा ह्यास्तव मी या आज्ञा तुम्हाकडे पाठवल्या आहेत,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
5“लेवीबरोबर केलेला माझा करार हा जीवनाचा व शांतीचा होता, आणि त्याने माझा सन्मान करावा ह्यासाठी मी त्यास तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्यास वाटले.
6खरे शिक्षण त्याच्या मुखात होते आणि त्याच्या ओठांत अनीती आढळली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्याने अन्यायापासून पुष्कळांना फिरवले.
7कारण याजकांच्या ओठांनी ज्ञान राखावे, आणि लोकांनी त्याच्या मुखाद्वारे शिक्षण शोधावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा दूत असा आहे.”
8“परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांस नियमशास्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीचा करार तुम्ही भ्रष्ट केला आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
9“ह्याबद्दल मी देखील तुला तिरस्कारणीय आणि सर्व लोकांसमोर नीच असे करीन. कारण तू माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्त्र पाळण्यात पक्षपात केला आहे.”
10आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरुद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो?
11यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.
12जो कोणी मनुष्य असे करतो आणि जो कोणी सेनाधीश परमेश्वरास अर्पण करतो त्यालाही परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून काढून टाकील.
13आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी, रडण्यांनी, उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषाने स्विकारत नाही.
14तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस.
15आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.
16इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचाही जो आपल्या वस्राबरोबर म्हणजे पत्नीबरोबर हिंसेने वागतो त्याचाही मला तिटकार आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका.”
17तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वरास कंटाळविले आहे. परंतु तुम्ही म्हणता, त्यास आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे, आणि त्यास त्याच्यात आनंद आहे. किंवा न्यायी देव कोठे आहे? असे म्हणून तुम्ही त्यास कंटाळविले आहे.