1“पाहा! मी माझा दूत पाठवत आहे, आणि तो माझ्यापुढे मार्ग तयार करील. आणि ज्या प्रभूला तुम्ही शोधता आणि ज्याच्यात तुम्ही आनंदी होता, तो कराराचा दूत, अचानक आपल्या मंदिरात येत आहे. पाहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”
2त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण टिकून राहणार? आणि जेव्हा तो दिसेल तेव्हा कोण उभा राहिल? कारण तो शुद्धकरणाऱ्या अग्नीसारखा आणि परीटाच्या खारासारखा आहे.
3आणि तो चांदी गाळणारा व स्वच्छ करणारा असा बनेल, आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुध्द करेल आणि ते न्यायीपणाने परमेश्वरास अर्पण करतील.
4तेव्हा जसे पुरातन दिवसात आणि प्राचीन वर्षात तसे यरूशलेम व यहूदाची अर्पणे परमेश्वरास सुखकारक असतील.
5“मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. आणि जादूटोणा, व्यभिचार, खोटी शपथ वाहणारे, आणि जे मोलकऱ्याला मोलाविषयी आणि विधवेला व अनाथाला पीडतात, आणि परराष्ट्रीयांचा न्याय विपरीत करतात, आणि माझे भय धरीत नाही यांच्याविरूद्ध मी त्वरीत साक्षी होईन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
6“कारण मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही, म्हणून याकोबाच्या मुलांनो, तुमचा नाश झाला नाही.
7तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात, ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही म्हणता, ‘आम्ही कसे परत फिरावे?’
8मनुष्य देवाला लुटणार काय? तरीही तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता, ‘आम्ही तुझे काय लुटले आहे?’ तुम्ही दशमांश व अर्पणे यांविषयी मला लुटता.
9तुम्ही संपूर्ण राष्ट्राने मला लुटले आहे, म्हणून तुम्ही शापाने शापीत झाला आहात.”
10सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठरांत आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पाहा.
11आणि खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी धमकावेन, मग तो तुमच्या भूमीचे पीक नाश करणार नाही, तुमच्या बागेतील द्राक्षवेलींचे फळ अकाली गळणार नाही,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
12“सर्व राष्ट्रे तुला सुखी म्हणतील, कारण तुमची भूमी आनंदाची होईल,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
13परमेश्वर म्हणतो, “तुमचे शब्द माझ्याविरूद्ध कठोर झाले आहेत. पण तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरूद्ध काय बोललो?”
14तुम्ही म्हणालात “परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे; आम्ही त्याचे आज्ञापालन केले, आणि आम्ही सेनाधीश परमेश्वरापुढे शोक करत चाललो याचा काय लाभ झाला?
15तर आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो, होय, जे दुष्टाई करतात ते वाढवले जातात, आणि ते देवाची परीक्षा पाहतात तरी सुटतात.”
16तेव्हा जे परमेश्वराचे भय धरीत असत ते एकमेकांशी बोलत होते, आणि परमेश्वराने ते ध्यान देऊन ऐकले. मग जे परमेश्वराचे भय धरत असत आणि त्याच्या नांवाचा सन्मान करत असत त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले.
17सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “मी हे करीन त्या दिवशी ते माझे, म्हणजे माझे खासगीचे धन होतील, आणि जसा कोणी आपली सेवा करणारा आपला मुलगा याच्यावर दया करीत असतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.
18तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हास कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील फरक तुम्हास समजेल.”