Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति.

नीति. 31

Help us?
Click on verse(s) to share them!
1ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः
2ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला?
3तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.
4हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.
5ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील.
6जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे.
7त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे.
8जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.
9तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.
10हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
11तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही.
12ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही.
13ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.
14ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते.
15रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.
16ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.
17ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.
18आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही.

19ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.
20ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.
21आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते.
22ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते.
23तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.
24ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.
25बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
26तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
27ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही.
28तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,
29“पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.”
30लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
31तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.