Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहे.

यहे. 32

Help us?
Click on verse(s) to share them!
1मग बाबेलातील बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
2मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्यास म्हण, राष्ट्रांमध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्यांचे पाणी गढूळ करतोस.
3प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी पुष्कळ लोकांच्या समुदायाकडून आपले जाळे तुझ्यावर पसरीन आणि ते तुला माझ्या जाळीने वर ओढून काढतील.
4मी तुला जमिनीवर सोडून देईन. मी तुला शेतांत फेकून देईन आणि आकाशातील सर्व पक्षी येऊन तुझ्यावर बसतील असे करीन. मी तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्याची भूक तृप्त करीन.
5कारण मी तुझे मांस पर्वतावर ठेवीन, आणि किड्यांनी भरलेली तुमची प्रेते दऱ्यांत भरीन.
6मग मी तुझे रक्त पर्वतावर ओतीन, तुझ्या रक्ताने प्रवाह भरून वाहतील.
7मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधारमय करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही.
8मी आकाशातील चमकणारा सर्व प्रकाश तुझ्यावर अंधार करीन आणि तुझ्या देशाला अंधारात ठेवीन. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9जेव्हा मी तुझा नाश करून तुला राष्ट्रांमध्ये, जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत त्यामध्ये आणीन तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय घाबरून सोडील.
10मी खूप लोकांस तुझ्याविषयी विस्मित करीन. जेव्हा मी आपली तलवार त्यांच्यापुढे परजीन, तेव्हा त्यांचे राजे दहशतीने थरथरतील. तुझ्या पतनाच्या दिवशी प्रत्येक मनुष्यास आपल्या जिवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल.
11कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाबेलाच्या राजाची तलवार तुमच्याविरुध्द येईल.
12योद्ध्याच्या तलवारीने तुझे सेवक पडतील असे मी करीन, प्रत्येक योद्धा राष्ट्राचा दहशत आहे! हे योद्धे मिसराचा गौरव उद्धस्त करतील आणि तिच्यातला सर्व समुदाय नष्ट करतील.
13कारण मी महाजलांजवळील त्यांच्या सर्व गुरांढोरांचा नाश करीन; मग मनुष्याचा पाय पुन्हा ती गढूळ करणार नाही. तसेच गुरांच्या खुरही ते गढूळ करणार नाही.
14मग मी त्यांचे पाणी शांत करीन आणि त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहतील असे करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
15जेव्हा मी मिसरची भूमी ओसाड करीन. म्हणजे तिच्यात जे भरले होते ते नाहीसे होऊन ती भूमी उजाड होईल, जेव्हा मी तिच्यातल्या सर्व राहणाऱ्यांस मारीन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
16तेथे विलाप होईल. कारण तिच्यावर राष्ट्रांच्या कन्या विलाप करतील. ते मिसरासाठी विलाप करतील. ते तिच्या सर्व सेवकांसाठी विलाप करतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
17मग बाराव्या वर्षांच्या, महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
18मानवाच्या मुला, मिसरातल्या लोकसमूहासाठी खेद कर आणि त्यांना, मिसर कन्येस आणि ऐश्वर्यशाली राष्ट्रांच्या कन्येस गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर अधोलोकी लोटून दे.

19त्यांना विचार, तू खरोखर कोणापेक्षाही अधिक सुंदर आहेस? खाली जा आणि बेसुंत्याबरोबर जाऊन पड.
20जे कोणी तलवारीने वधले त्यामध्ये जाऊन ते पडतील! मिसर तलवारीला सोपून दिला आहे; व तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
21योद्ध्यातले जे बलवान ते त्याच्याशी व त्यास सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती तलवारीने वधले ते तेथे पडले आहेत.
22अश्शूर तिच्या समुदायाबरोबर तेथे आहे. तिच्या कबरा तिच्यासभोवती आहेत; ते सर्व त्यांच्या तलवारीने वधलेले आहेत.
23ज्या कोणाच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत, तिचा समुदाय तिच्या कबरेभोवती तेथे आहे. जे जिवंताच्या भूमीत ज्यांनी दहशत घातली ते सर्व वधलेले, तलवारीने पडले आहेत.
24तेथे एलाम आहे व तिच्या सर्व समुदाया बरोबर तिच्या कबरेभोवती आहे. ते सर्व वधलेले, तलवारीने पडलेले आहेत. ते बेसुंती असताना पृथ्वीच्या खालच्या स्थानात गेले आहेत. ते जिवंताच्या भूमीत दहशत घालीत ते सर्व वध पावले आहेत.
25त्यांनी एलाम व त्याच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यामध्ये शय्या तयार केली. त्याच्याभोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती तलवारीने मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताची भूमी दहशतीने भरली आहे. म्हणून गर्तेत उतरणाऱ्यांबरोबर ते लज्जित झाले आहेत. वधलेल्यामध्ये त्यांना ठेवले आहे.
26तेथे मेशेख, तुबाल आणि त्यांचा सर्व समूह आहे. त्यांच्या कबरा त्यांच्या सभोवती आहेत. ते सर्व बेसुंती तलवारी मारलेले आहेत. कारण त्यांनी जिवंताच्या भूमीत आपली दहशत आणली.
27बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहीले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांवर आहे.
28म्हणून हे मिसरा, बेसुंतीमध्ये तुझा नाश होईल. आणि तलवारीने वधलेल्यांबरोबर पडून राहशील.
29तेथे अदोम तिचा राजा आणि तिच्या सर्व अधिपतीबरोबर आहे. ते सर्व शक्तीशाली होते, पण आता ते तलवारीने वधलेल्याबरोबर पडले आहे, बेसुंतीबरोबर, जे कोणी खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ठेवले आहेत.
30उतरेकडचे सर्वच्या सर्व अधिकारी व वधलेल्याबरोबर खाली गेलेले सर्व सीदोनी हे तेथे आहेत. ते शक्तीशाली होते आणि ते दुसऱ्यांना घाबरून सोडत, पण आता ते लज्जेने, जे तलवारीने वधले गेले त्या बेसुंतीबरोबर पडून राहिले आहेत.
31फारो त्यांना पाहील तेव्हा तो आपल्या सर्व समूहाविषयी समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैन्य यांस तलवारीने वधले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो,
32मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचा समुदाय हे तलवारीने वधलेल्याबरोबर बेसुंतीमध्ये पडून राहतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.