Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - अनु.

अनु. 2

Help us?
Click on verse(s) to share them!
1मोशे आणखीन पुढे म्हणाला; “परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानात निघालो बरेच दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो.
2परमेश्वर तेव्हा मला म्हणाला,
3‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा.
4आणि लोकांस आणखी एक सांग, तुम्हास वाटेत सेईर लागेल. ती भूमी एसावाच्या वंशाजांची, तुमच्या भाऊबंदांची आहे त्यांना तुमची भीती वाटेल तेव्हा सांभाळा.
5त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे.
6तुमचे अन्न पैसे देवून, विकत घेवून खा. पाणीही विकत घेवून प्या.
7तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही.’
8तेव्हा एसावचे वंशज राहत असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो.
9परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’”
10पूर्वी तेथे एमी लोक राहत असत. ते बहुसंख्य, धिप्पाड व अनाकी लोकांप्रमाणे महाकाय होते.
11या एमींना लोक अनाकी यांच्याप्रमाणेच रेफाई समजत असत. पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.
12पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत. पण एसावाच्या वंशजांनी त्यांची जमीन बळकावली, होरींचा संहार केला व तेथे स्वत: वस्ती केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या देशाचे इस्राएलींनी जसे केले तसेच त्यांनी इथे केले.
13“मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले.” त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.
14कादेश बर्ण्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या पिढीतील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने शपथ वाहिल्या प्रमाणे हे झाले.
15त्यांचा समूळ नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा त्यांच्यावर हात उगारलेला होता
16ह्याप्रकारे सर्व योद्धे मरण पावले, ती पिढी नामशेष झाली,
17परमेश्वर मला म्हणाला,
18“तुला आज मवाबाची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे.

19तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”
20त्या भागाला “रेफाई देश” असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना “जमजुम्मी” म्हणत.
21जमजुम्मी संख्येने पुष्कळ व सशक्त होते. अनाकी लोकांप्रमाणे ते धिप्पाड होते. पण त्यांचा संहार करायला अम्मोनी लोकांस परमेश्वराचे साहाय्य होते. आता त्या जमिनीचा ताबा घेऊन अम्मोनी तेथे राहतात.
22एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात.
23त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते, त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत.
24पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा व आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर.
25तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील.”
26मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,
27“तुमच्या देशातून आम्हास जाऊ दे. आमची वाट सोडून आम्ही उजवीडावीकडे वळणार नाही.
28तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पाणीही पैसे घेऊन विकत प्यायवयास दे, आम्हास फक्त इथून पलीकडे पायी जाऊ दे.
29यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हास देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हास जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हास जाऊ दिले तसेच तूही कर.”
30पण हेशबोनचा राजा सीहोन आपल्या देशातून जाऊ देईना. आपण त्यास पराभूत करावे म्हणूनच तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यास कठोर केले. त्याचे मन कठीण केले. आज तुम्ही पाहातच आहात की तो देश आपल्या हाती आहे.
31परमेश्वर मला म्हणाला, “सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून त्यांचा ताबा घे.”
32आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले.
33परमेश्वर देवाने त्यास आपल्या ताब्यात दिले म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व सर्व लोकांचा पराभव करू शकलो.
34त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.
35तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली.
36आर्णोन खोऱ्याच्या कडेला वसलेले अरोएर नगर, खोऱ्याच्या मध्यावरील एक नगर तसेच आर्णोन खोरे ते गिलादापर्यंत सर्व नगरे, आमचा देव परमेश्वर याने आम्हास दिली. आम्हास दुर्गम असे एकही नगर नव्हते.

37अम्मोन्याचा प्रदेश वगळता फक्त यब्बोक नदीच्या किनाऱ्यावर तसेच डोंगराळ प्रदेशातील नगरांकडे आम्ही गेलो नाही. कारण आमचा देव परमेश्वर याने तेथे जाण्यास बंदी केली होती.