Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - अनु.

अनु. 26

Help us?
Click on verse(s) to share them!
1तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे वस्ती कराल.
2तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व प्रथम उत्पन्न गोळा करून घरी आणाल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा.
3व त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की “परमेश्वराने आमच्या पूर्वजांनी आम्हांला शपथपुर्वक जो देश देण्याचे वचन दिले होते. त्यामध्ये मी पोहोंचलो आहे,”
4मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील.
5तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, “आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले.
6तेथे मिसरी लोकांनी आम्हास वाईट वागणूक दिली. आम्हास गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला.
7मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले.
8मग परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठ्या भयानकपणाने चमत्कार व चिन्ह प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले.
9आणि येथे आम्हास आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हास दिली.
10आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.” मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वरास वंदन करा.
11त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यामध्ये लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करून घ्या.
12प्रत्येक तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तुझ्या गावात तृप्त होतील.
13यावेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की “माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.
14मी दु:खी मन:स्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी आपला देव परमेश्वर याचे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे.
15आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांस आशीर्वाद दे. आम्हास दिलेल्या भूमीला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हास द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.”
16“तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हास आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन:पूर्वक पाळा.
17परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.
18परमेश्वराने आज तुम्हास पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हास त्याने सांगितले आहे.

19इतर सर्व राष्ट्रापेक्षा तो तुम्हास महान करणार आहे. तो तुम्हास प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा व्हाल.”