Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र.

स्तोत्र. 118

Help us?
Click on verse(s) to share them!
1परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
2इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
3अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
4परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
5मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
6परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?
7माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.
8मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
9मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
10सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.
11त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
12त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
13मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.
14परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.
15उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
16परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
17मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
18परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.

19माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.
20हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.
21मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.
22इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.
23परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.
24परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
25हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
26परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.
27परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.
28तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
29अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.