Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यश.

यश. 3

Help us?
Click on verse(s) to share them!
1पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यरूशलेम व यहूदा यांच्यापासून आधार व टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे;
2शक्तीमान पुरुष, योद्धा, न्यायधीश, संदेष्टा, ज्योतिषी, वडील,
3पन्नासांचा कप्तान, प्रतिष्ठित नागरिक, मंत्री, कूशल कारागीर व निपुण जादूगार.
4“मी फक्त युवकास त्यांचे अधिकारी म्हणून नेमीन, आणि युवक त्यांच्यावर राज्य करतील.
5सर्व लोक दडपशाहीमुळे धास्तावतील; प्रत्येकजण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे; लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठीतांना आव्हान करतील.
6आपल्या वडिलाच्याच घरात कोणी आपल्या भावाला जबरदस्तीने म्हणेल, आणि तुझ्याजवळ झगा आहे; तू आमचा शासक हो व तुझ्या हाताखाली हे नाश होऊ दे.
7त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, ‘मी बरे करणारा होणार नाही, माझ्याजवळ भाकरी व वस्त्रही नाहीत, तुम्ही मला लोकांचा शासक करू नका.’”
8कारण यरूशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे, कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे.
9त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्याच विरूद्ध साक्ष देतात; आणि सदोमाप्रमाणे ते त्यांच्या पापाविषयीच्या गोष्टी सांगतात; ते त्या लपवीत नाहीत. त्यांचा नाश होवो! कारण त्यांनी स्वतःवर आपत्ती आणली आहे.
10नीतिमानास सांगा कि त्यांचे भले होईल; कारण ते आपल्या कृतींचे फळ खातील.
11पाप्याचा नाश होवो! त्याचे वाईट होईल, कारण त्याने आपल्या हाताने जे केले, ते त्यास मिळेल.
12माझ्या लोकांनो; लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात, व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळात टाकतात.
13परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे.
14परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील. तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे.
15तुम्ही माझ्या लोकांचा संपूर्ण नाश का करीता व गरिबांना अतिशय यातना का देता? असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
16परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.
17म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभू देव रोगग्रस्त खरूज उत्पन्न करील, आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील.
18त्या दिवशी प्रभू त्यांचे सुंदर असे पायातील दागिने, डोक्याचे बंध, गळयातील चंद्रकोरी हार,

19कर्णफुले, कंकणे, आणि घुंगट;
20शिरभूषणे, पैंजणे, कमरपट्टे, सुगंधी द्रव्यांचा डब्ब्या, आणि भाग्यवान आकर्षणे काढून टाकील.
21तो अंगठ्या, नथी दागिने;
22सणाचे वस्त्रे, आवरणे, ओढण्या, हातातील बटवे;
23हातातले आरसे, तलम सणाचे वस्त्र, डोक्यावरील वस्त्रे, आणि ओढण्या काढून टाकील.
24तेथे गोड सुगंधा ऐवजी दुर्गंध; कमरपट्ट्या ऐवजी रस्सी, आकर्षक केशरचने ऐवजी टक्कल, झग्याऐवजी तरटाचे वस्त्र, आणि सौंदर्याच्या जागी डाग राहतील.
25तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील.
26यरूशलेमेच्या वेशी शोक व विलाप करतील; आणि ती एकटी असेल व जमिनीवर बसून राहील.