Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - मार्क - मार्क 6

मार्क 6:5-38

Help us?
Click on verse(s) to share them!
5थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही.
6त्यांच्या अविश्वासामुळे त्यास आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.
7नंतर येशूने बारा शिष्यांना आपणाकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला.
8आणि त्यास आज्ञा केली की, “काठीशिवाय प्रवासासाठी दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका.
9तरी चपला घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.”
10आणखी तो त्यास म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडीपर्यंत राहा.
11आणि ज्याठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.”
12मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली.
13त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून त्यांना बरे केले.
14हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.”
15इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.”
16परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.”
17हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते.
18व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.”
19याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही,
20कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे.
21मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली.
22हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.”
23तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.”
24ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.”
25आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.”
26राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही.
27तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले.
28ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.
29हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
30यानंतर प्रेषित येशूभोवती जमले आणि त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्यास सांगितले.
31नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.
32तेव्हा ते सर्वजण तारवात बसून रानात गेले.
33परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदरच ते तेथे पोहोचले.
34येशू किनाऱ्याला आल्यावर, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्यास त्यांचा कळवळा आला; म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला.
35दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे.
36लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.”
37परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?”
38तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

Read मार्क 6मार्क 6
Compare मार्क 6:5-38मार्क 6:5-38