Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - जख.

जख. 9

Help us?
Click on verse(s) to share them!
1हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचे वचन: “कारण जशी इस्राएलाच्या वंशांवर तशी मानवजातीवर परमेश्वराची दृष्टी आहे;”
2तसेच सोर व सीदोन आणि हद्राखच्या सीमेवरील हमाथ याविषयीची भविष्यवाणी; कारण तेथील लोक अतिबुध्दिवान आहेत.
3सोराने स्वतःसाठी एक मजबूत किल्ला बांधला आहे आणि धुळीएवढी चांदी आणि चिखलाप्रमाणे रस्त्यात शुद्ध सोन्याचे ढिग लावले आहेत.
4पाहा! परमेश्वर, तिला तिच्या भूमीवरून हाकलून लावेल आणि तो तिच्या सागरी शक्तीचा नाश करील; अशाप्रकारे तिला आगीत भस्मसात करील.
5“अष्कलोन हे पाहील आणि भयभीत होईल! गज्जाचे लोक भीतीने खूप थरथर कापतील, आणि एक्रोन शहराची आशा नष्ट होईल. गाझामधील राजा नाश पावेल व अष्कलोनात यापुढे वस्ती राहणार नाही.
6अश्दोदात अनोळखी येवून आपली घरे वसवतील व पलिष्ट्यांचा गर्व नाहीसा करीन.
7त्यांच्या मुखातले रक्त आणि दातांतले निषिध्द अन्न मी काढून टाकीन; यहूदाच्या वंशाप्रमाणे तेही आमच्या देवासाठी शेष असे एक घराणे म्हणून राहतील आणि एक्रोनचे लोक यबूस्यांसारखे होतील.
8माझ्या देशातून कोणत्याही सैन्याने येवू-जाऊ नये म्हणून मी माझ्या भूमीभोवती तळ देईन, कोणीही जुलूम करणारा त्यांच्यातून येणारजाणार नाही. कारण आता मी स्वत: त्यांच्यावर आपली नजर ठेवीन.”
9हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे; आणि तो तारण घेवून येत आहे. तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.
10त्यानंतर मी एफ्राईममधील रथांचा आणि यरूशलेमेतील घोडदळाचा नाश करीन आणि युध्दातील धनुष्यबाण मोडतील; कारण तो शांतीची वार्ता राष्ट्रांशी बोलेल, त्याचे राज्य सर्व समुद्रांवर आणि महानदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत असेल.
11आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुझ्याशी मी केलेल्या माझ्या कराराच्या रक्तामुळे, निर्जल खड्ड्यांतून तुझ्या बंधकांना मुक्त केले आहे.
12आशावान कैद्यांनो, मजबूत दुर्गांकडे परत या! मी आजही जाहीर करतो की मी तुम्हास दुप्पटीने प्रतिफळ देईन
13कारण मी यहूदाला धनुष्य म्हणून वाकवले आहे. एफ्राईमरूपी बाणांनी मी आपला भाता भरला आहे. हे सियोने, ग्रीसच्या पुत्रांशी लढायला मी तुझ्या पुत्रांना उत्तेजित केले आहे. त्यांना योद्ध्याच्या तलवारीप्रमाणे मी ग्रीसाच्याविरूद्ध वापरीन.
14परमेश्वर त्यांना दर्शन देईल आणि विजेप्रमाणे आपले बाण सोडील. माझा प्रभू परमेश्वर, तुतारी फुंकेल आणि दक्षिणेकडून वावटळीप्रमाणे तो चालून येईल.
15सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड व गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील व त्यांना गिळतील व मद्यप्राशन केल्याप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील.
16आपल्या कळपाप्रमाणे परमेश्वर देव त्यादिवशी त्यांचे संरक्षण करील; आपले लोक त्यास मुकुटातील रत्नांप्रमाणे त्यांच्या देशात उच्च होतील.
17हे सर्व किती मनोरम व किती सुंदर होईल! तरुण पुरुष धान्याने आणि कुमारी गोड द्राक्षरसाने पुष्ट होतील.