Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 राजे

2 राजे 21

Help us?
Click on verse(s) to share them!
1मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचावन्न वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.
2परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)
3हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पूजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली, तसेच त्याने बआलदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची ही पूजा करत असे.
4आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की, “मी आपले नाव यरूशलेमेत ठेवीन,” तेथे परमेश्वराच्या घरात मनश्शेने वेद्या बांधल्या.
5या खेरीज परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
6आपल्या मुलाचाच बली देऊन मनश्शेने त्यास वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतवैद्य यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
7मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरूशलेमची निवड केली आहे. यरूशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.
8इस्राएल लोकांस या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईल. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली, तर त्यांची इथेच या भूमीत वस्ती राहील.”
9पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
10तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले,
11“यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यापेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीपुढे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.
12तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर म्हणतो, ‘यरूशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांस धक्का बसेल.
13शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याचा ओळंबा मी यरूशलेमेवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करून ठेवावी तशी मी यरूशलेमची गत करीन.
14मी आपल्या वतनांतल्या राहिलेल्यांचा त्याग करून त्यांना त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे व भक्ष्य असे होतील.
15मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले, त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.
16शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरूशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”
17मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेली आहेत.
18मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्यास पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.

19आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
20आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
21तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.
22आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.
23आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करून त्याच्या घरातच राजाला ठार केले.
24आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली, त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
25आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.
26उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.