Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - निर्ग.

निर्ग. 7

Help us?
Click on verse(s) to share them!
1परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी तुला फारोच्या नजरेत देवासमान महान करतो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
2ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्व तू अहरोनाला सांग; मग तू इस्राएल लोकांस हा देश सोडून जाऊ दे, असे तू फारोला सांग.
3परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन.
4तरीही फारो तुमचे काही ऐकणार नाही. तेव्हा मग मी आपला हात मिसरावर चालवीन आणि त्यास जबर शिक्षा करून मी आपली सेना, माझे लोक, इस्राएल वंशज यांना मिसर देशातून काढून आणीन.
5आणि मिसरावर मी हात उगारून त्यांच्यातून इस्राएली लोकांस काढून आणीन, तेव्हा मिसऱ्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
6मग मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.
7ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता.
8नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
9“फारो तुम्हास एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकावयास सांग म्हणजे तिचा साप होईल.”
10तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.
11तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला.
12त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले.
13तरी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
14मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांस जाऊ देत नाही.
15उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नदीच्या काठी त्यास भेटण्यास उभा राहा.
16त्यास असे सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांस त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, पण आतापर्यंत तू ऐकले नाहीस.
17परमेश्वर म्हणतो, की मी परमेश्वर आहे हे त्यास यावरुन कळेल: मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल.
18मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.

19परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनाला सांग की, आपली काठी घेऊन मिसर देशामधील नद्यांवर, नाल्यावर, त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल.”
20तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उचलून फारोच्या व त्याच्या अधिकाऱ्यासमोर पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.
21नदीतले मासे मरण पावले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसरी लोकांस नदीतील पाणी पिववेना. अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले.
22तेव्हा मिसराच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले.
23नंतर फारो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला. त्याने याकडे लक्ष देखील दिले नाही.
24मिसराच्या लोकांस नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
25परमेश्वराने नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.