Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - एज्रा

एज्रा 9

Help us?
Click on verse(s) to share them!
1या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, “इस्राएल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात.
2कारण त्यांनी आपणाला व आपल्या मुलांना त्यांच्या काही स्त्रिया करून घेतल्या आहेत आणि पवित्र लोक इतर देशाच्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. आणि अधिकारी व नेते हेच प्रथम यामध्ये अप्रामाणिक आहेत.”
3जेव्हा हे मी ऐकले, मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. नंतर मी शरमेने खाली बसलो.
4तेव्हा या अविश्वासूपणाविषयी ऐकून जे सर्व इस्राएली लोक देवाच्या वचनाने थरथर कापत होते ते माझ्याभोवती जमले आणि संध्याकाळची अर्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे शरमेने खाली बसून राहिलो.
5संध्याकाळची अर्पणांची वेळ झाली तेव्हा मी अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा अपमानीत स्थितीत मी गुडघे टेकून व माझा देव परमेश्वर याच्यापुढे हात पसरुन बसलो.
6मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.
7आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगिक राजाच्या हाती तलवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत.
8आमच्या देवाने आमचे डोळे प्रकाशीत केले आहेत. आमच्या दास्यपणात आम्हास दिलासा दिलास. परमेश्वर आमचा देव याने आम्हावर कृपा केली आहे. तू आमच्यापैकी काहीजणांना वाचवून अवशेष ठेवले आहे. आणि त्याच्या पवित्रस्थानात आमच्या पायांना खुंटीचा आधार दिला आहे.
9आम्ही गुलामच आहोत. तरी आमचा देव आम्हास विसरला नाही. पण त्याने आमच्यावर कराराप्रमाणे विश्वास योग्यता दाखवली. आमच्या देवाचे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यास त्यांना नवीन शक्ती दिली यासाठी पारसाच्या राजाची आमच्यावर कृपा होईल असे केलेस. यहूदा आणि यरूशलेमेच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्यकारी झालास.
10परंतु आमच्या देवा, आता यानंतर आम्ही काय बोलावे? कारण आम्ही तुझ्या आज्ञा विसरून गेलो आहोत.
11त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हास दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे.
12त्यामुळे आता तुमच्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या मुली तुमच्या मुलांना करू नका आणि कधी त्यांची शांती आणि सुस्थिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका यासाठी की, तुम्ही बलशाली होऊन त्या देशाचे उत्तम फळ खावे, अशा रीतीने आपल्या मुलांबाळासाठी तो प्रदेश सर्वकाळासाठी ताब्यात घ्यावा.
13आमच्या वाईट कृत्यामुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर, हे आमच्या देवा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हास केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले.
14आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ लोकांशी सोयरीक करावी काय? काहीही शिल्लक राहणार नाही, कोणीही निसटणार नाही असा आमचा संपूर्ण नाश करीपर्यंत तुझा क्रोध आमच्यावर पेटणार नाही काय?
15हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस. तू आजच्याप्रमाणे आम्हास वाचवून अवशेष ठेवले आहेस. पाहा, आम्ही इथे तुझ्यापुढे आमच्या अपराधामुळे आहोत, यामुळे तुझ्यापुढे कोणालाहि उभे राहता येत नाही.”