Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - एज्रा

एज्रा 1

Help us?
Click on verse(s) to share them!
1पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने राजा कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.
2“पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.
3जो इस्राएलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे, त्याचा देव तुम्हासोबत आहे. तुम्ही यहूदातील यरूशलेमास वर जाऊन, जो इस्राएलाचा व यरूशलेमेचा देव, त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे.
4तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत, त्यांनी त्या भागातून यरूशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने, चांदी व धन, गुरेढोरे इत्यादी गोष्टीचा त्यांना पुरवठा करावा.”
5तेव्हा यहूदा व बन्यामिनाच्या घराण्यातील प्रमुखांनी, याजक व लेवी आणि प्रत्येकजण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदीर बांधण्यासाठी यरूशलेमेला जाण्यास सिद्ध झाले.
6जे लोक त्यांच्या सभोवती राहत होते, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले.
7यरूशलेम मधून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबुखद्नेस्सराने काढून आपल्या स्वतःच्या देव-घरात ठेवली होती, ती कोरेश राजाने बाहेर काढली.
8ती पारसाचा राजा कोरेशाने, आपला खजिनदार मिथ्रदाथ याच्या हाती दिली. त्याने ती शेशबस्सर या यहूदी अधिकाऱ्याला मोजून दिली.
9त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याच्या पराती, एक हजार चांदीच्या पराती, एकोणतीस सुऱ्या,
10तीस सोन्याच्या वाट्या, चारशे दहा चांदीच्या वाट्या, आणि एक हजार इतर पात्रे,
11सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण पाच हजार चारशे पात्रे होती. तेव्हा शेशबस्सराने बाबेलमधून यरूशलेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली.