1आसाफाचे स्तोत्र देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.
2गाणे गा आणि डफ वाजवा, मंजुळ वीणा व सतार वाजवा.
3नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
4कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.
5जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला, तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली.
6मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे; टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत.
7तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.
8अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो, हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.
9तुझ्यामध्ये परके देव नसावेत; तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस.