1दाविदाचे स्तोत्र देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत; जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत.
2जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक; जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत.
3परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत; ते हर्षोत आणि आनंदी होवोत.
4देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
5तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
6देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो; तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात.