Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 119

स्तोत्र. 119:121-172

Help us?
Click on verse(s) to share them!
121मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
122तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
123तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
124तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
125मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
126ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
127खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
128यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
129तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
130तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
131मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
132तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
133तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
134मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
135तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
136माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
137हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
138तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
139रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
140तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
141मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
142तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.
143मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
144तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
145मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.
146मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
147मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.
148तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
149तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.
150जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.
151हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
152तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
153माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
154तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
155दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.
156हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.
157मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.
158विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.
159तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव.
160तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
161अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.
162ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.
163मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.
164मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.
165तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.
166हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
167मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
168मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
169हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
170माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
171तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
172माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.

Read स्तोत्र. 119स्तोत्र. 119
Compare स्तोत्र. 119:121-172स्तोत्र. 119:121-172