Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 राजे - 1 राजे 2

1 राजे 2:4-30

Help us?
Click on verse(s) to share them!
4तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.
5सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत.
6तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको.
7गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
8गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामिनी आहे. मी महनाईमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शापाचे उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्यास मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.
9पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.”
10मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले.
11हेब्रोनवर सात वर्ष आणि यरूशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले.
12आता शलमोन आपल्या वडिलांच्या दाविदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.
13यानंतर हग्गीथेचा पुत्र अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्यास विचारले, “तू शांतीने आला आहेस ना?” अदोनीया म्हणाला, हो, “ही शांतता भेट आहे.”
14“मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”
15अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की, हे राज्य माझे होते. तुम्हास हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलाच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.
16आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणू नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
17अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
18बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”
19मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
20नंतर बथशेबा त्यास म्हणाली, “मला एक छोटीशी विनंती तुझ्याजवळ करायची आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
21ती म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”
22राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखील का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”
23मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधिक माझे करो.
24इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडिल दावीद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
25राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
26मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडिल दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दाविदाला साथ दिली आहेस”
27शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.
28ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.
29“कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे” हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”
30बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला “मी येथेच मरेन.” तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्यास हे सांगितले यवाब म्हणतो मी वेदीपाशीच मरेन.

Read 1 राजे 21 राजे 2
Compare 1 राजे 2:4-301 राजे 2:4-30