5हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.
6कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?
7पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.
8हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
9समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
10तू राहाबाला ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.
11आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.
12उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर आणि हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
13तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे.
14निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
15जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
16ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.
17त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
18कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
19पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
20मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
21माझा हात त्यास आधार देईल; माझा बाहू त्यास बलवान करील.
22कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
23मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
24माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; माझ्या नावाने ते विजयी होतील.
25मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
26तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
27आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
28मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
29त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
30जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
31जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
32मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
33परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.