2मी शहाणपणाचे गीत गाईन; मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.
3ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
4त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
5कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले. त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की, त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.
6त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
7मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.
8तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.