6तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
7परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
8रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
9कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
10थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
11परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
12दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
13प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
14जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
15परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
16अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
17कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.