1दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?
2जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले, तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.
3जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.
4मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन, परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन, परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
5कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; तो मला त्याच्या तंबूत लपवेल, तो मला खडकावर उंच करील.
6तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल, आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार, मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुती गाईन.
7परमेश्वरा, मी तुला आरोळी करेन तेव्हा माझा आवाज ऐक! माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे.
8माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन.
9तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस; तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस! तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस; माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस.
10जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, परमेश्वर मला उचलून घेईल.
11परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव. माझ्या वैऱ्यामुळे, मला सपाट मार्गावर चालव.
12माझा जीव शत्रूस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, आणि ते हिंसक श्वास टाकतात.
13जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.
14परमेश्वराची वाट पाहा; मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो. परमेश्वराची वाट पाहा.