Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लूक - लूक 4

लूक 4:22-41

Help us?
Click on verse(s) to share them!
22तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?
23येशू त्यांना म्हणाला, “नक्कीच, तुम्ही मलाही म्हण लागू कराल; हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.” मग तो पुढे म्हणाला,
24“मी तुम्हास खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या नगरात स्वीकारला जात नाही.
25मी तुम्हास खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षापर्यंत आकाशातून पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.
26तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्यास सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
28हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले.
29ते लोक उठले आणि त्यांनी येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्यास लोटून देण्यास तेथवर नेले.
30परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
31नंतर तो गालील प्रांतातील कफर्णहूम गावी गेला. तो शब्बाथ दिवशी सभास्थानात त्यास शिक्षण देत होता.
32ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे.
33त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
34हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस.
35येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला.
36तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात.
37अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली.
38येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली.
39येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली.
40सूर्य मावळत असतांना, निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या सर्व मनुष्यांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले.
41कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही.

Read लूक 4लूक 4
Compare लूक 4:22-41लूक 4:22-41