Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यिर्म.

यिर्म. 33

Help us?
Click on verse(s) to share them!
1नंतर यिर्मया पहारेकऱ्यांच्या अंगणात अजूनही बंदीस्त असता त्याच्याकडे दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
2परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो,
3मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
4कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, नगराची घरे व यहूदाच्या राजाची घरे वेढ्याच्या उतरंडीमुळे व तलवारीमुळे पडले आहे याविषयी म्हणत आहे.
5खास्दी लढाईस येत असताना ज्या लोकांस मी आपल्या क्रोधाने आणि कोपाने ठार केले तेव्हा त्यांच्या सर्व दुष्टतेमुळे मी आपले मुख या नगरापासून लपविले आहे त्यांच्या मृतदेहाने जी घरे भरली.
6पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन.
7कारण मी यहूदी आणि इस्राएल यांचे भाकीत परत आणीन; मी पूर्वीप्रमाणेच त्यांना बांधीन.
8मग त्यांनी ज्या अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले त्या सर्वापासून मी त्यांना धुवून स्वच्छ करीन. मी त्यांनी ज्या आपल्या सर्व अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले व ज्या सर्व मार्गाने त्यांनी माझ्याविरूद्ध बंड केले त्या सर्वांची मी त्यांना क्षमा करीन.
9कारण हे नगर पृथ्वीतल्या सर्व राष्ट्रांसमोर मला आंनदाचे नाव, स्तुतीचे गीत, सन्मानास कारण असे होईल. त्यांचे सर्व हित मी करीन ते ती ऐकतील आणि जे सर्व हित व जे सर्व कुशल मी त्यांना प्राप्त करून देईन त्यावरून ती भयभीत होतील व थरथर कापतील.
10परमेश्वर असे म्हणतो, या स्थानाविषयी तुम्ही आता म्हणता की हे ओसाड आहे. तेथे यहूद्याच्या नगरात कोणी माणसे व प्राणी नाहीत आणि यरूशलेमेचे रस्ते निर्जन झाले आहेत, माणसे व पशू नाहीत.
11तेथे पुन्हा आनंद व हर्षाचा शब्द ऐकू येईल. नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सर्वकाळची आहे. असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात उपकारस्तुतीचे अर्पण आणतील त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास परत उलटवून सुरुवातीला जसे होते तसे करीन, असे परमेश्वर म्हणतो.
12सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, या निर्जन स्थानात, जेथे आता मनुष्य व प्राणी कोणीही नाही. त्यातल्या सर्व नगरात कळप बसविणाऱ्या मेंढपाळांची वस्ती पुन्हा होईल.
13डोंगराळ प्रदेशातील नगरात, मैदानातील नगरात, आणि दक्षिणप्रदेशातील नगरात, बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशात व यहूदाच्या नगरात, व नेगेबातील प्रदेशात मोजदाद करणाऱ्याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.
14परमेश्वराचे असे म्हणणे आहे, पाहा! असे दिवस येत आहेत जे मी इस्राएल आणि यहूदाच्या घराण्यासाठी जे वचन दिले आहे ते मी करीन.
15त्या दिवसात आणि त्यावेळी मी दावीदासाठी धार्मिकतेची शाखा वाढवीन आणि ती देशात न्याय आणि धार्मिकता चालवील.
16त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता आहे या नावाने बोलवतील.
17कारण परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणाऱ्यांची उणीव दावीदाला कधीच पडणार नाही.
18तसेच माझ्यासमोर होमार्पणे अर्पिणारा, अन्नार्पणाचा यज्ञ करणारा व नित्य यज्ञ करणारा यांची लेवीय याजकास उणीव पडणार नाही.”

19यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
20परमेश्वर असे म्हणतो, “जर तू दिवस आणि रात्र या विषयीचा जो माझा करार तुमच्याने मोडवेल यासाठी की, दिवस आणि रात्र आपापल्या योग्यवेळी होऊ नयेत म्हणून,
21तर माझा सेवक दावीद याच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल यासाठी की त्यास त्याच्या सिंहासनावर राज्य करायला मुलगा होऊ नये आणि माझी सेवा करणारे लेवी जे याजक त्यांच्याशी जो करार आहे तोही मोडून जाईल.
22ज्याप्रमाणे आकाशातील सैन्य मोजू शकत नाही आणि जसे समुद्रकाठच्या वाळूचे मापन होऊ शकत नाही. त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याच्या वंशजांना आणि जे लेवी माझी सेवा करतात त्यांनाही मी बहुगुणित करीन.”
23यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले व म्हणाले,
24“हे लोक जे काय बोलले, ते तू ऐकलेस लक्षात घेतले नाहीस, ते म्हणतात की, जी दोन घराणी परमेश्वराने निवडली ती त्यांना सोडून दिले आहेत काय? याप्रकारे त्यांच्या दृष्टीने पुन्हा राष्ट्र होऊ नये असे ते माझ्या लोकांस तुच्छ लेखतात.”
25परमेश्वर असे म्हणतो, “जर माझा दिवस व रात्र याविषयीचा माझा करार अढळ नाही किंवा मी जर आकाशाचे आणि पृथ्वीचे नियम स्थापिले नाहीत,
26तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद याच्या संततीचा मी त्याग करीन आणि दावीदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन.”