Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो.

यहो. 9

Help us?
Click on verse(s) to share them!
1मग यार्देन नदीच्या पश्चिमी डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांचे जे सर्व राजे होते.
2त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्राएल यांच्या विरुद्ध लढाई पुकारली.
3यहोशवाने यरीहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,
4तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी राजदुतांप्रमाने वर्तणूक केली, आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षरसाचे बुधले घेतले;
5त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुनेपुराणे कपडे घातले; त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटल्या होत्या.
6ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्यास व इस्राएल लोकांस म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.”
7इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांस म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.”
8ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहो.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आला?”
9त्यांनी त्यास म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून आम्ही तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत. कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे;
10आणि यार्देनेच्या पलीकडील अमोरी लोकांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथातला बाशानाचा राजा ओग, यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे.
11तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.”
12या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या; पण आता त्या वाळून बुरसटल्या आहेत.
13हे द्राक्षरसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.
14तेव्हा लोकांनी त्यांचे काही अन्न स्वीकारले; पण त्यांनी मार्गदर्शनासाठी परमेश्वर देवाचा सल्ला घेतला नाही.
15मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली.
16इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसानी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.
17नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे गिबोन, कफीरा, बैरोथ व किर्याथ-यारीम.
18पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकुर केली.

19परंतु सर्व नेत्यांनी सगळ्या लोकांस सांगितले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.
20त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जिवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”
21नेत्यांनी लोकांस सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” नेत्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्राएली लोकांचे लाकूडतोडे व पाणक्ये झाले.
22यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हांला का फसवले?
23म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन रहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन रहाल.”
24त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्यांचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जीवाची फार भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.
25आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”
26त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातातून सोडवले; इस्राएल लोकांनी त्यांना जिवे मारले नाही,
27यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.