Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 16

लेवी. 16:18-31

Help us?
Click on verse(s) to share them!
18मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
19मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
20जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.
21अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
22तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
23मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.
24मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
25मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा.
26ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.
27पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
28ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; त्यानंतर तो छावणीत येऊ शकतो.
29तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो;
30हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.
31तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे.

Read लेवी. 16लेवी. 16
Compare लेवी. 16:18-31लेवी. 16:18-31