22जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.
23कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.
24ते तुला अनितीमान स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते, व्यभिचारी स्त्रीच्या गोडबोल्या जिभेपासून तुझे रक्षण करते.
25तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो.
26वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.
27मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय?
28जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय?
29जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.
30जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.
31पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल.
32जो व्यभिचार करतो तो बुद्धिहीन आहे; जो आपल्या जिवाचा नाश करू इच्छितो तो असे करतो.
33जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.
34कारण ईर्ष्या मनुष्यास संतप्त करते; सूड उगविण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.
35तो काही खंडणी स्वीकारणार नाही, आणि त्यास खूप दाने दिली तरी तो शांत राहणार नाही.