Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - उत्प.

उत्प. 8

Help us?
Click on verse(s) to share them!
1देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली.
2पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला.
3पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले.
4सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले.
5दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले.
6चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली
7त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला.
8नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले,
9परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले.
10तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले;
11ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले.
12नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही.
13असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले, तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता.
14दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी कोरडी झाली होती.
15देव नोहाला म्हणाला,
16“तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये.
17तुझ्या बरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यांसह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण. यासाठी की, त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्य पट भरभराट व्हावी आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावेत.”
18तेव्हा नोहा, त्याची पत्नी, मुले व मुलांच्या स्त्रिया यांच्यासह तारवातून बाहेर आला;

19त्याच्या बरोबरचा प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक रांगणारा प्राणी व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव, आपापल्या जातीप्रमाणे तारवातून बाहेर आले.
20नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली. त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशुंतून काही घेतले, आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले.
21परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, “मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही; मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहेत. मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जिवांचा नाश करणार नाही.
22जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.”