Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - उत्प.

उत्प. 28

Help us?
Click on verse(s) to share them!
1इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, “तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको.
2ऊठ, तू पदन-अरामात तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा. आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान त्याच्या मुलींपैकीच एकीला पत्नी करून घे.
3सर्वसमर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो.
4तो तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्राहामाचे आशीर्वाद देवो, आणि जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो.”
5अशा रीतीने इसहाकाने याकोबाला दूर पाठवले. याकोब पदन-अराम येथे, अरामी बथुवेलाचा मुलगा, याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान याच्याकडे गेला.
6एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला, व पदन-अरामातून पत्नी करून घेण्यासाठी तिकडे पाठवले. त्याने हे देखील पाहिले की, इसहाकाने त्यास आशीर्वाद दिला आणि आज्ञा देऊन म्हणाला की, “तू कोणत्याच कनानी स्त्रियांतली पत्नी करू नये.”
7एसावाने हे देखील पाहिले की, याकोबाने आपल्या बापाची आणि आईची आज्ञा मानली, आणि पदन-अरामास गेला.
8एसावाने पाहिले की, आपला बाप इसहाक याला कनानी मुली पसंत नाहीत.
9म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आपल्या स्त्रिया होत्या त्यांच्याशिवाय अब्राहामाचा मुलगा इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण महलथ ही पत्नी करून घेतली.
10याकोबाने बैर-शेबा सोडले व तो हारानाला गेला.
11तो एका ठिकाणी आला आणि सूर्य मावळला म्हणून त्याने तेथे रात्रभर मुक्काम केला. तेथे रात्री झोपताना त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यांपैकी एक धोंडा घेतला, तो त्याच्या डोक्याखाली ठेवला आणि त्या ठिकाणी झोप घेण्यासाठी खाली पडून राहिला.
12तेव्हा त्यास स्वप्न पडले आणि त्याने पाहिले, एक शिडी पृथ्वीवर उभी आहे. तिचे टोक वर स्वर्गापर्यंत पोहचलेले आहे आणि देवाचे दूत तिच्यावरून चढत व उतरत आहेत.
13पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन.
14तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके होतील, आणि तुझा विस्तार पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे व दक्षिणकडे होईल. तुझ्यामध्ये व तुझ्या वंशजांमध्ये पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.
15पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू जेथे कोठे जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; कारण मी तुला सोडणार नाही. मी तुला जी सर्व अभिवचने दिली ते सर्व मी करीन.”
16मग याकोब त्याच्या झोपेतून जागा झाला, व म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, आणि हे मला समजले नव्हते.”
17त्यास भीती वाटली आणि तो म्हणाला, “हे ठिकाण किती भीतिदायक आहे! हे देवाचे घर आहे, दुसरे काही नाही. हे स्वर्गाचे दार आहे.”
18याकोब मोठ्या पहाटे लवकर उठला आणि त्याने उशास घेतलेला धोंडा घेतला. त्याने तो स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर तेल ओतले.

19त्या ठिकाणाचे नाव लूज होते, परंतु त्याने त्याचे नाव बेथेल ठेवले.
20मग याकोबाने शपथ वाहून नवस केला, तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यामध्ये माझे रक्षण करील, आणि मला खावयास अन्न व घालण्यास वस्त्र देईल,
21आणि मी सुरक्षित माझ्या वडिलाच्या घरी परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल.
22मग मी हा जो धोंडा या ठिकाणी स्तंभ म्हणून उभा केला आहे तो पवित्र धोंडा होईल, तो देवाचे घर होईल. जे सर्व तू मला देशील, त्याचा दहावा भाग मी तुला खचित परत देईन.”