Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 करिं.

2 करिं. 1

Help us?
Click on verse(s) to share them!
1देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,
2देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
3आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
4तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
5कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
6आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
7आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
8बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
9खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
10त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
11तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.
12आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
13कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात, त्यावाचून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहीत नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो.
14त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहा, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
15आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा.
16मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे.
17असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
18पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही.

19कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती.
20कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
21आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
22तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
23मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मरुन आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथला आलो नाही.
24आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.