Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 राजे - 1 राजे 22

1 राजे 22:26-43

Help us?
Click on verse(s) to share them!
26तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
27आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.”
28मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
29नंतर इस्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोथ-गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
30अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलाच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करून युध्दाला सुरुवात केली.
31अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.
32तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटाला पाहिले. “तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले.” त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला.
33हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही.
34तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नक्की इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दूर जाऊ.”
35युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहत होता. त्यास एवढा रक्तस्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला.
36सूर्यास्ताच्या वेळी “इस्राएलाच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.”
37राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला. त्यास त्यांनी तिथे पुरले.
38शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाच्या रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नक्की घडले.
39इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबाच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे.
40अहाब मरण पावला व त्यास त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
41अहाब इस्राएलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र.
42यहोशाफाट वयाच्या पस्तीसाव्या वर्षी राजा झाला आणि यरूशलेमामध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची कन्या.
43यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडिल आसा ह्यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्याठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.

Read 1 राजे 221 राजे 22
Compare 1 राजे 22:26-431 राजे 22:26-43