Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 थेस्स.

1 थेस्स. 4

Help us?
Click on verse(s) to share them!
1बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कोणत्या वागणूकीने देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
2कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत.
3कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे
4आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे.
5देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये.
6कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास आधीच सांगितले होते व बजावलेही होते.
7कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.
8म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.
9बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे;
10आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.
11आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची आवड तुम्हास असावी.
12बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.
13पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.
14कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.
15कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.
16कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील.
17मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
18म्हणून तुम्ही या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.