Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 25

लेवी. 25:23-34

Help us?
Click on verse(s) to share them!
23जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;
24म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतुद करावी.
25तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमत्तेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी.
26आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.
27तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्यास शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी.
28पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
29एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.
30परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाहीतर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढया त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही.
31तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.
32परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील.
33एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व ते त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत.
34लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.

Read लेवी. 25लेवी. 25
Compare लेवी. 25:23-34लेवी. 25:23-34