Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - इब्री.

इब्री. 7

Help us?
Click on verse(s) to share them!
1हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला.
2व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो.
3मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्युची नोंद आढळत नाही. देवपुत्रा प्रमाणे तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.
4यावरुन तुम्ही ध्यानात घ्या, मलकीसदेक किती महान पुरूष होता! मूळ पुरूष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्यास दिला.
5आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे इस्त्राइल लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून, नियमशास्त्राप्रमाणे दशांश गोळा करावा.
6मलकीसदेक लेव्यांच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्यास त्याने आशीर्वाद दिला.
7यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते.
8एका बाबतीत म्हणजे जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे.
9एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात.
10कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.
11लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांस नियमशास्त्र दिले गेले, पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता.
12कारण जेव्हा याजकपण बदलते तेव्हा नियमशास्त्रसुद्धा अवश्य बदलते.
13कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे व त्याच्या वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही.
14हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभू यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.
15आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हाही गोष्ट आणखी स्पष्ट होते.
16मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने त्यास याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्यास याजक करण्यात आले.
17कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.”
18जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व निरुपयोगी होता.

19कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हास देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
20हे सुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही.
21जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा ते शपथेवाचून याजक झाले आहेत पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्यास सांगितले की, ‘प्रभूने शपथ वाहिली आहे आणि तो आपले मन बदलणार नाही, तू युगानुयुगाचा याजक आहेस.’
22याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे
23तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे निरंतर ते याजकपद चालवू शकले नाही.
24त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो ‘युगानुयुग’ राहतो.
25म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
26म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे.
27जे मुख्य याजक पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्यास करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे.
28कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.