Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 9:1-19 in Marathi

Help us?

1 राजे 9:1-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शलमोनाने परमेश्वराचे मंदिर आणि राजमहाल यांचे काम पूर्ण केले, व त्याच्या मनात जे होते त्याप्रमाणे त्याने केले.
2 यापूर्वी गिबोनामध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्यास दर्शन दिले.
3 परमेश्वर त्यास म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थानाकडे माझे मन व दृष्टी सतत राहील.
4 तुझे वडिल दावीद यांच्या प्रमाणेच चांगल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास,
5 तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्राएलाच्या राजासनावर येईल. तुझे वडिल दावीद याला मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांची सत्ता इस्राएलावरून कधीच खुटंणार नाही.
6 पंरतु तू किंवा तुझ्या मुलाबाळांनी हा मार्ग सोडला व माझ्या आज्ञांचे पालन केले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात,
7 तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना हुसकावून लावीन. इतर लोकात तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे. पण माझे आज्ञापालन केले नाहीतर ते मी नजरेआड करीन.
8 हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?’
9 यावर इतर जण सांगतील, याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाच्या त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.”
10 परमेश्वराचे मंदिर आणि महाल या दोन्हींचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली.
11 त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूप मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
12 शलमोनाने हिराम सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्यास ती तितकीशी पसंत पडली नाहीत.
13 राजा हिराम म्हणाला, “माझ्या बंधो काय ही नगरे तू मला दिलीस?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.
14 हिरामने राजा शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी एकशें विस किक्कार सोने पाठवले होते.
15 शलमोन राजाने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरूशलेम सभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
16 मिसरच्या फारो राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानी लोकांस त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
17 शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोनही पुन्हा बांधले.
18 तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे बांधली,
19 शलमोनाने अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरूशलेमामध्ये, लबानोनात आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्यास हवे ते ते बांधले.
1 राजे 9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी